भुसावळ तालुक्यात शिक्षक पोहोचले पालकांच्या दारी
In Bhusawal taluka teachers reached parents’ doors भुसावळ : नगरपरीषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल शाळेतील भानखेडा व तिघ्रा या खेड्यांवरील विद्यार्थ्यांचे पालक शाळेत सभेसाठी येऊ शकत नसल्याने तसेच त्यांचा कामाचा रोज बुडत असल्याने त्यांच्याच गावी जाऊन शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षक भेटीने पालकही भारावले
विद्यार्थी हा पाच ते सहा तास शाळेत म्हणजेच शिक्षकांकडे असतो व बाकीचे 18 ते 19 तास तो पालकांच्या ताब्यात असल्याने त्यासाठी शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी केला की नाही, रोज आपला पाल्य शाळेत जातो किंवा नाही यासाठी पालकांनी लक्ष द्यावे म्हणजेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास हातभार लागेल, असे शिक्षकांनी यावेळी पालकांना पटवून दिले. भानखेडा व तिघ्रा येथे अंगणवाडीत सभा झाली. यात मोठ्या संख्येने पालक शिक्षक उपस्थित होते. डॉ.प्रदीप साखरे यांनी सर्व विषय पालकांना समजून सांगितले व मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना रोज शाळेच्या युनिफॉर्ममध्ये नियमित पाठवावे, त्यांच्या गाडीची, पुस्तक, वह्या व कपडे याची व्यवस्था सर्व शाळेने केली असून या गोष्टीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यास करावा व आपले पाल्य तो करत आहे की नाही याची शहानिशा करावी, असे आवाहन केले. पालकांच्या समस्या सर्व शिक्षकांनी जाणून घेतल्या शिक्षक पालकांच्या या संवादातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल, असा सूर त्या ठिकाणी उमटला. सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.

