वाघझिरा आश्रम शाळेतील शिक्षकाचा विहिरीत तोल जावून पडल्याने मृत्यू
यावल : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या बालाजी मंदिरासमोरील कोरड्या विहिरीच्या कठड्यावर बसलेल्या वाघझिरा आश्रम शाळेतील शिक्षकाचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. वॉकींग करीत असताना विश्रांती घेण्यासाठी शिक्षक विहिरीवर बसले होते. या घटनेनंतर तातडीने पोलीस आणि नागरीक घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नितीन छगन निंबाळे (45, बालाजी सिटी, यावल) असे मयत शिक्षकाचे नाव आहे.
कोरड्या विहिरीत जबर मार लागल्याने मृत्यू
यावल शहरात भुसावळ रस्त्यावर श्री बालाजी मंदिर असून या मंदिराच्या समोर एक कोरडी विहिर आहे. या परीसरात नितीन छगन निंबाळे (45, बालाजी सिटी) हे वॉकिंग करीत असताना वॉकिंग करत असतांना ते विहिरीच्या कठड्यावर जाऊन काही वेळ बसले असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. ही घटना निदर्शनास येतात नागरीकांनी पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. तातडीने नागरीक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी निंबाळे यांना विहिरीतून काढले मात्र विहिर कोरडी असल्याने त्यांना विहिरीत पडल्यामुळे जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. ते वाघझिरा येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मिलिंद दिलीप मिस्ततरी (रा.फैजपूर) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.
