आजीला पाहण्यासाठी आलेल्या नातवाचाही फैजपूरात हृदयविकाराने मृत्यू
फैजपूर : वयोवृद्ध आजीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अखेरचे पाहण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय नातवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आजीच्या आधीच त्याला मृत्यूचे द्वार गाठावे लागले. त्यानंतर दोन तासांनी आजीनेही जगाचा निरोप घेतला. मनसून्न करणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे शहरात घडली. कमलाबाई कोंडू मोरे (90) असे मयत आजीचे तर वैभव विष्णू मोरे (24) असे नातवाचे नाव आहे.
आजी आधी नातवाने गाठले स्वर्गाचे द्वार
फैजपूर शहरातील लक्कडपेठ भागात डी.के.मोरे ज्वेलर्सचे दत्तात्रय मोरे वास्तव्याला आहे. त्यांच्या 90 वर्षीय आई कमलाबाई याची प्रकृती खालावल्याचा निरोप गावात राहणारे त्यांचे दुसरे भाऊ विष्णू मोरे (भारंबेवाडा, फैजपूर) यांना देण्यात आल्यानंतर विष्णू मोरे यांचा मुलगा वैभव उर्फ विक्की याने हा निरोप ऐकताच तातडीने आजीला भेटण्यासाठी निघाला मात्र घराची पायरी चढताच त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने तो कोसळला. तातडीने त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
वैभव हा आजीची शेवटची भेट ही घेऊ शकला नाही. त्यानंतर दोन तासांनी आजी कमलाबाई यांचाही मृत्यू झाला. या दुहेरी दुःखाने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मंगळवारी दुपारी आजी आणि नातवावर येथील वैकुंठ धामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील नागरीक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
