रेल्वेत नोकरीच्या आमिषाने कळव्यातील सेवानिवृत्ताची दहा लाखात फसवणूक ; भुसावळातील एकाविरोधात गुन्हा
A retired person from Kalva was cheated of one million with the lure of a job in the railways ; Crime against one in Bhusawal भुसावळ : रेल्वे विभागात मुलांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ठाण्यातील कळवा भागातील सेवानिवृत्ताची तब्बल नऊ लाख 65 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात प्रकाश हरीचंद्र सोनवणे (रा.सोमेश्वर नगर, शांतीनगर, भुसावळ) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
विश्वास व्यंकटेश वालवडकर (61, दिवेश हाईट, रूम क्रमांक 401, भुसारअळी, कळवा, ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, जुलै 2019 ते जून 2023 दरम्यान, संशयित प्रकाश सोनवणे याच्या घरी व तक्रारदाराच्या घरी संशयित सोनवणे याने दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले तसेच वरीष्ठांशी ओळख असल्याची बतावणी करीत वेळोवेळी नऊ लाख 65 हजार स्वीकारले. नोकरी कधी लागेल, याची विचारणा केल्यानंतर उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली तसेच सेंट्रल रेल्वेच्या नावाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून ते वालवडकर यांना देण्यात आली मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वालवडकर यांनी भुसावळ शहर पोलिसात धाव घेत बुधवारी तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहेत.








