विनापरवाना लाकडाची वाहतूक : ट्रकसह ट्रॅक्टर रावेर वनविभागाकडून जप्त
Unlicensed timber transport : Tractor along with truck seized by Raver Forest Department रावेर : वनविभागाच्या गस्ती पथकाने विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक व ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर लाकूड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वन विभागाचे गस्तीपथक रावेर ते बर्हाणपूर रस्त्याने गस्त करीत असताना खानापूर गावाजवळ संशयित मिनी ट्रक आल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता वाहनात जळाऊ लाकूड भरलेले दिसले तर वाहन चालकाकडे परवाना नसल्याने वाहन जप्त करण्यात आले व ते रावेर वनविभागाच्या शासकीय आगारात लावण्यात आले.
वाहन चालकाविरोधात गुन्हा
वाहनातून 11 हजार 102 रुपये किंमतीचे पंचरास जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले असून दोन लाख रुपये किंमतीचा मिनिट्र जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अहिरवाडी वनपाल यांच्या तक्रारीवरून मिनी ट्रकवरील चालक आरोपी शेख ईस्माईल शेख जावीद (21, ईमामवाडा, रावेर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केली कारवाई
ही कार्यवाही धुळे वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, यावल वनविभाग जळगावचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, सहस्रलिंग वनपाल अरविंद धोबी, वाघझिरा वनपाल विपूल पाटील, फैजपूर वनपाल अतुल तायडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दुसर्या कारवाईत ट्रॅक्टर जप्त
यावल पूर्वचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे, गस्ती पथकाचे वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, वनपाल आर.बी.थोरात, वाहन चालक योगीराज तेली, कॉन्स्टेबल सचिन तडवी खिरोदा ते फैजपूर रस्त्याने गस्त करीत असताना 2 रोजी सायंकाळी 6.30 वाजता स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 बी.जी.3621) हे विनापरवाना लाकूड वाहतूक करताना आढळून आल्याने ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करण्यात आले. याप्रकरणी लाकडास ट्रॅक्टर मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा करण्यात आले.


