भुसावळात उघड्या खिडकीतून दोन मोबाईलसह रोकड लांबवली
Cash along with two mobile phones were stolen from an open window in Bhusawal भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या मजुराच्या घरातून चोरट्यांनी मध्यरात्री खिडकी उघडी असल्याची संधी साधत 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच दहा हजार रुपये किंमतीची रोकड चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार 3 रोजी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खिडकीतून प्रवेश करीत चोरी
असलम ईदू पिंजारी (36, मुस्लीम कॉलनी, अस्मा शादी हॉलजवळ, भुसावळ) हे मजुरी काम करतात. मध्यरात्री ते कुटूंबासह झोपले असताना घराची खिडकी उघडी राहिल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करीत दहा हजारांची रोकड तसेच 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबवले. पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.








