किनगावातील तरुणाचा अखेर तिसर्या दिवशी आढळला मृतदेह
The body of the young man from Kingaon was finally found on the third day यावल : भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर सेल्फी काढतांना 38 वर्षीय तरुण नदीत कोसळून पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला होता. तब्बल तीन दिवसानंतर रविवारी या तरुणाचा मृतदेह अंजाळे गावाजवळ आढळला. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला व शवविच्छदेन करून कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तीन दिवसानंतर मृतदेहच आला हाती
किनगाव, ता.यावल येथील शेख शरीफ शेख अशरफ यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचे पाहुणे अय्युब गयास शेख (38) हे शुक्रवारी दुपारी भुसावळ जवळील तापी नदीवर दुचाकीव्दारे आले होते व त्यांनी पुलावर दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 डी.डी.1054) लावली व तापी नदीच्या पुलावरून थेट नदीत उडी घेतली व तो वाहत्या पाण्यात बुडून ते बेपत्ता झाला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली व पोलिसांचे पथक नदीवर दाखल झाले व काही पोहणार्यांच्या मदतीने नदीत शोध घेतला मात्र हा तरुण दोन दिवस मिळून आला नाही. रविवारी सकाळपासून शोध मोहिम राबवण्यात आल्यानंतर तापी पुलापासून सुमारे सात किमी अंतरावरील अंजाळे गावालगतच्या नदीपात्रात मृतदेह आढळून आला. दुपारी चार वाजता मृतदेह मिळाल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व घटनास्थळी पोलीस नाईक किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी, निलेश वाघ पथकासह दाखल झाले. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला येथे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला. मयत शेख अय्युब यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, 10 महिन्यांची मुलगी असा परीवार आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








