रामानंद पोलिसांची मोठी कामगिरी : कार चोरटे जाळ्यात
Big achievement of Ramanand Police : Car thieves in the net जळगाव : जळगावसह कुसूंबा येथील कार चोरट्यांना रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. विशाल संजय सपकाळे (21, रा.कुसुंबा, जि.जळगाव) आणि वैभव महेंद्र बारी (21, रा.खंडेराव नगर, जळगाव) अशा अटकेतील संशयितांची नावे आहे असून त्यांच्याकडून चोरी केलेली कार जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील शिव कॉलनी परीसरात राहणारे रवींद्र हरी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीची इंडिका कार क्रमांक (एमएच 19 एपी 3860) ही 6 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी विशाल संजय सपकाळे (21, रा. कुसुंबा, ता.जि.जळगाव) आणि वैभव महेंद्र बारी (21, रा.खंडेराव नगर, जळगाव) या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलीसांनी खाक्या दाखवताच दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी ही चोरी इतर दोन जणांच्या मदतीने केली असल्याचे देखील सांगितले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली कार ही पोलिसांनी हस्तगत केली आहे.






यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, राजेश चव्हाण, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, उमेश पवार यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत असून कार चोरीचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


