कारवाईनंतरही मुजोरी कायम : महसूल महिला कर्मचार्यांशी धक्काबुक्की
Suffering continues even after action : Clashes with revenue women employees जळगाव : जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरात वाळू वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करीत असलेल्या महसूल विभागाच्या महिला पथकाशी वाद घालून दमदाटी करीत वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाला दमदाटी करीत लांबवले वाहन
अवैध वाळू रोखण्यासाठी मंडळाधिकारी सारिका दुरगुडे, छाया कोळी, तलाठी मृणाली सोनवणे, आदिती जाधव, राजकन्या घायवट, प्रज्ञाराणी वंजारे, अनिता झाल्टे यांचे भरारी पथक कार्यरत असताना शुक्रवारी दुपारी 12 वाजता कानळदा रोडवरील केसी पार्क येथे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आढळून आली. पथकाने त्यासमोर दुचाकी लावून ट्रॅक्टर चालकास रोखले. त्याची चौकशी करीत असताना चालकाचे साथीदार प्रमोद उर्फ भैय्या भिकन सपकाळे (कुवरखेडा) व वाणी (जुने जळगाव) आले व त्यांनी शाब्दीक वाद घालून दमदाटी करून पथकाच्या दुचाकी ट्रॅक्टर समोरुन बाजुला केल्या. तसेच तलाठी मृणाली सोनवणे यांची दुचाकी धक्का देवून बाजुला करीत ट्रॅक्टर चालकाला पळून जाण्यास मदत केली.








