जळगावातील ट्रक चालक तरुणाची हत्या : दोघांना अटक
Murder of truck driver youth in Jalgaon : Two arrested जळगाव : शहरातील ट्रक चालक तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सागर रमेश पालवे (25, मालदाभाडी, ता.जामनेर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू
सागर पालवे हा आई व वडील यांच्यासोबत जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्याला होता तर गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते जळगाव येथील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता. गुरूवार, 7 सप्टेंबर रोजी त्याचे काही लोकांसोबत वाद झाल्यानंतर शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्याचा ट्रान्सपोर्ट नगरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.अच्छा यांनी मयत घोषीत केल्यानंतर प्राथमिक तपासात सागर पालवेचय अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने अज्ञातांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली. तरुणाच्या खुनानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.








