रेल्वेत मोबाईल चोरी : तिघा गुन्ह्यातील आरोपी जाळ्यात


भुसावळ : रेल्वेत प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तीन मोबाईल वेगवेगळ्या गाड्यांमधून लांबवले होते. या प्रकरणी तीनही गुन्ह्यातील आरोपींना चोरीच्या मोबाईलसह अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदाराला मोबाईल परत देण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला मोबाईल परत
भुसावळ-
वेटींग रूममध्ये झोपलेले रेल्वे प्रवासी सागर मुनाजी पवार (21, चौदावी गल्ली, जुने धुळे) यांचे दोन हजार 300 रुपये रक्कम असलेले पाकिट तसेच सात हजार 400 रुपये किंमतीचा मोबाईल नितीन राजेंद्र द्विवेदी (27, वॉर्ड नंबर 11, जि.चित्रकुट्यास) याने लांबवल्याने त्यास अटक करण्यात आली होती. 1 नोव्हेंबर 2019 रोजी ही घटना घडली होती. न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदार यांना मोबाईल परत देण्यात आला. प्रसंगी लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, सुनील पाटील व राजेंद्र पाटील उपस्थित होते.




महानामा एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरी : आरोपी ताब्यात
भुसावळ-
सुरत ते वाराणसी असा प्रवास करणार्‍या प्रवासी प्रतीक किशोर मुंदडा (30, बिरदोतपूर कॉलनी, गिरीनगर, भेजपूर, वाराणसी, उत्तरप्रदेश) यांचा 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी उभी असताना चोरट्याने लांबवला होता. 8 ऑगस्ट 2019 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी शमीम खान नसीम खान (19, ख्वॉजा नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) यास 28 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 20903 महानामा एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक बी- 1 मधील सीट क्रमांक 36 वरून मुंदडा प्रवास करीत असताना गाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतर चोरट्याने मोबाईल लांबवला होता. लोहमार्गचे निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मधुकर न्हावकर, हवालदार शैलेंद्र पाटील, जयकुमार कोळी, स्नेहा अडकिणे आदींनी ही कारवाई केली.

गीतांजलीतून मोबाईल लांबवणारा आरोपी गजाआड
भुसावळ-
डाऊन गीतांजलींमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना 27 रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी सादीक शेख नैजुद्दीन शेख खान (19, सुन्नी मशिदीजवळ, पिंप्राळा, जळगाव) यास मंगळवारी अटक करण्यात आली. तक्रारदार संदीप शांताराम क्षिरसागर (36, कोठारी वाटिका दोन, मलकापूर, जि.अकोला) हे डाऊन 12859 गीतांजलीच्या जनरल कोचमधून भुसावळ-अकोला प्रवास करीत असताना चोरट्याने पँटमधून मोबाईल लांबवला होता. भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म सहावरून आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, तसेच आरपीएफचे आरक्षक महेंद्र कुशवाह, अमितकुमार अहिरवार, नितीन पाटील व रामकृष्ण खंडागळे आदींच्या पथकाने केली.

शालिमार एक्स्प्रेसमध्ये मोबाईल लांबविणारा अटकेत
भुसावळ-
जळगाव रेल्वे स्थानकावरून शालिमार एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये चढत असताना चोरट्याने सहा हजार 200 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना 17 ऑक्टोबर 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी सागर अरुणप्रसाद वाजपेयी (29, संजय गांधी नगर, चाळीसगााव) यांनी तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्यात 29 रोजी आरोपी शेख रईस शेख सुपडू (23, दूध फेडरेशन रोड, जळगाव) यास चोरीच्या मोबाईलसह अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामराव इंगळे, शैलेंद्र पाटील व जयकुमार कोळी
यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !