अस्वस्थता, भीती, न्यूनगंडपणा वाढवणारा स्पर्श म्हणजे बॅड टच शशिकांत वारुळकर
किनगावच्या इंग्लिश मिडीयम रेसिडेंशियल स्कूलमध्ये ‘पोक्सो’ बाबत मार्गदर्शन
यावल : बालकांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. मुलांना जो स्पर्श सुखद वाटतो, जो आपल्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करतो किंवा आपल्याला सन्मान देतो तो स्पर्श म्हणजे गुड टच तर ज्या स्पर्शाने आपल्या मध्ये अस्वस्थता, भीती, न्यूनगंडपणा वाढतो तो स्पर्श म्हणजे बॅड टच होय, असे मत वक्ते समांतर विधी सहायक शशिकांत वारुळकर यांनी व्यक्त केले. यावल तालुका विधी सेवा समिती यावल आणि यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा (पोक्सो) 2012’ या विषयावर किनगावच्या इंग्लिश मिडीयम रेसिडेंशियल स्कूलमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यावल न्यायालयाचे दिवाणी न्या.सुनील बा.वाळके यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रमा झाला.
पोस्को कायद्यात अनेक शिक्षेच्या तरतुदी
शशिकांत वारुळकर म्हणाले की, अलीकडच्या काळात आपली वैज्ञानिक प्रगती खूप झाली असली तरी समाजामध्ये विकृत मनोवृत्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परीस्थितीत बॅड टचसाठी अनेकानेक प्रलोभने दाखवली जातात किंवा भीती दाखवली जाते पण याला बळी न पडता आपण त्याचा विरोध केला पाहिजे अन्यथा आपण स्वतः किंवा दुसरा कोणीतरी अशा विकृत घटनेचा बळी ठरू शकतो. ’पोक्सो’ कायद्यामध्ये अनेक कडक शिक्षेच्या तरतुदी केल्या असल्या तरी याला बळी न पडणे हेच श्रेयस्कर आहे असे त्यांनी सांगितले. तरीही अशा काही घटना घडल्याच त्याची वाच्यता आपल्या पालकांकडे अथवा शिक्षकांकडे लगेचच करावी जेणेकरून मोठा अनर्थ टळेल, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन सुहास भालेराव तर प्रिन्सिपाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी कोर्टाचे सी.एम.झोपे, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका अहिरराव, विद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.







