रावेर लोकसभा निवडणूक : डॉ.केतकी पाटील भाजपाच्या वाटेवर !


Raver Lok Sabha election : Dr. Ketki Patil on the way to BJP! रावेर : रावेर लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत असतानाच आता या निवडणुकीसंदर्भात मोठी घडामोड समोर येत आहे. काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील या लवकरच भाजपात प्रवेश करण्याचे संकेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 जानेवारीच्या दौर्‍यानंतर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

आमदार खडसेंनी केली होते भाकीत
गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी कधीपासूनच सुरू केली आहे शिवाय त्यांनी जनसंपर्क वाढवला असून मतदारांकडून त्यांना आशीर्वादही मिळत आहेत. डॉ.केतकी यांनी कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता जनसंपर्क मोहिम सुरू केली आहे. आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत तर स्वत: आमदार एकनाथ खडसे यांनी अलीकडेच डॉ. केतकी पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असे भाकीतही केल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला अधिक महत्व आले आहे.


आधी प्रवेश मगच होणार दावा
डॉ.केतकी पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. पक्षाकडून रावेरमधून लढण्यासाठी आधी प्रवेश करून मग दावा करता येईल या हेतूने त्या भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे समजते. अर्थात, यातून त्या रावेरच्या जागेसाठी दावा पक्का करणार आहेत. दरम्यान, जळगावातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांच्या कार्यक्रमापासूनही डॉ.केतकी या लांब राहिल्या व या घडामोडी पाहता त्या भाजपात जाण्याची शक्यता अधिक आहे.

योग्य वेळी निर्णय जाहीर करणार : डॉ.केतकी पाटील
‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने राजकीय घडामोडी व प्रसारीत होणार्‍या बातम्यांच्या अनुषंगाने खात्री करण्यासाठी डॉ.केतकी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, अद्याप भाजपात जाण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. योग्य वेळी आपली भूमिका आपण मांडणार आहोत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !