अमळनेर पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदाराचे अखेर निलंबन
The bribery constable of Amalner police station is finally suspended अमळनेर : बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणार्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्यातील हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण यांना बुधवार, 10 रोजी सकाळी अटक करण्यात आली होती. हवालदाराला अटकेनंतर एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, लाच प्रकरणात हवालदाराला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे शिवाय निलंबन काळात नियंत्रण कक्षात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
30 हजारांची लाच भोवली
तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी 7 जानेवारी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30 हजारांची लाच मागितली व त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केली. धुळे एसीबीने 9 रोजी लाचेबाबत पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी 30 हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार सांगितल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर घनश्याम पवार यांना एसीबीने अटक केली होती.


लाचखोर हवालदाराचे अखेर निलंबन
लाच प्रकरणात हवालदार घनश्याम अशोक पवार यांना धुळे एसीबीने पकडल्यानंतर त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लाच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हवालदाराचे निलंबन केले असून त्यांची मुख्यालयात त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
