फुलगाव शिवारात महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न : डंपर चालकासह मालकाला बेड्या
Attempt to crush revenue team in Phulgaon Shivar : Owner shackled with dumper driver भुसावळ : अवैध वाळू वाहतूक करणार्या डंपरने महसूल पथकाच्या वाहनाला धडक देत कर्मचार्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना 11 जानेवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास फुलगाव शिवारात घडली होती. याप्रकरणी डंपर व मोटार सायकल चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डंपर चालकासह मालकाला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत तर महसूलच्या पथकाला पाळत ठेवणार्या दुचाकीस्वारालाही पकडण्यात आले आहे. सुभाष पंडित कोळी असे डंपर मालकाचे तर पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे (23, नांद्रा खुर्द, ता.जळगाव) असे अटकेतील डंपर चालकाचे नाव आहे.
पथकाने केला 50 किलोमीटर पाठलाग
जळगावकडून भुसावळकडे येत असलेले पिवळ्या रंगाचे डंपर (एम.एच.19 झेड.4669) पथकाने इशारा करून थांबवले मात्र डंपर चालकाने वाहन न थांबवता वाहन पळून नेण्याचा प्रयत्न केला. साकेगाववरून बोहर्डी फाटा ब्रीजखाली वळवून पुन्हा जळगावच्या दिशेने वळवून डंपर जळगाव तालुक्यातील कडगावपर्यंत जवळपास 50 किलोमीटरचा पाठलाग करण्यात आला. डंपर चालकाने कडगाव शिवारातील दादरच्या शेतात डंपर नेत 14 हजार रुपये किंमतीची वाळू खाली करीत डंपर सोडून पोबारा केला. तत्पूर्वी महसूल कर्मचारी वाहन थांबवित असताना महसूल पथकातील कर्मचारी यांच्या अंगावर डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तर तहसीलदारांच्या पथकातील वॅगन आर वाहनाला धडक देवून पाच हजारांचे नुकसान करण्यात आले होते.वरणगाव मंडळाधिकारी रजनी तायडे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पाच दिवसांनी आरोपींना बेड्या
आरोपींचा कसून शोध सुरू असताना संशयित नांद्रा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, हवालदार संदीप सावळे, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, मोतीलाल चौधरी, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने केली.
