33 केव्हीची केबल जळाल्याने भुसावळात 21 तास अंधार
नागरीकांचे हाल : पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवस पुढे ढकलले
21 hours of darkness in Bhusawal due to burning of 33 KV cable भुसावळ : भुसावळ शहराला वीजपुरवठा करणारी 33 केव्हीची वाहिनी नाहाटा महाविद्यालयाजवळील पुलाखाली जळाल्यानंतर अर्ध्या शहराचा (उत्तर ीागा) पुरवठा तब्बल 21 तास ठप्प झाल्याने भुसावळकरांचे चांगलेच हाल झाले. वीज कंपनीच्या तक्रार क्रमांकावर संपर्क साधूनही संपर्क होत नसल्याने ग्राहक अधिकच संतप्त झाले तर अधिकार्यांकडून रीप्लाय मिळत नसल्याने जो तो नागरीक नेमका काय बिघाड झाला? याबाबत विचारणा करताना दिसून आला. सोमवार, 15 रोजी रात्री आठ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुसर्या दिवशी मंगळवार, 16 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले. दरम्यान, खंडित वीजपुरवठ्यामुळे शहराचे पाणीपुरवठा रोटेशन एक दिवस पुढे ढकलले गेले तर विजेअभावी व्यावसायीकांना व नागरीकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला.
केबल जळाल्याने शहर अंधारात
वीज कंपनीच्या माहितीनुसार, भुसावळातील उत्तर भागाला वीजपुरवठा करणार्या 33 केव्हीच्या दोन्ही अंडरग्राऊंड केबल नाहाटा क्रॉसिंग ब्रीजवळ जळाल्याने सोमवारी रात्री शहराचा उत्तर भाग अंधारात बुडाला. रात्री उशिरा वीज कंपनीच्या अधिकार्यांकडून बिघाड शोधण्यास सुरूवात झाल्यानंतर रात्री उशिरा बिघाड लक्षात आला मात्र रात्री उशिरापर्यंत वीज प्रवाह सुरळीत होवू शकला नाही तर स्टॅण्डबाय वीज जोडणी केल्यानंतर पुन्हा केबल जळाली. मंगळवारी सकाळी पुन्हा युद्ध स्तरावर बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले तर भुसावळकरांची गैरसोय टाळण्यासाठी साकेगाव केंद्रातून पर्यायी लाईन जोडण्यात आली.


पाणीपुरवठा एक दिवस उशिरा
33 केव्हीची लाईन जळाल्यानंतर उत्तर भागात वीजपुरवठा झाला नाहीव पर्यायाने तापीनगर सबस्टेशनच बंद पडल्याने उत्तर भागात पालिकेचे पंपींग हाऊस व जलशुध्दीकरण केंद्रही बंद झाल्याने शहरातील दोन्ही भागांचा पाणीपुरवठा सोमवारी रात्री आठ वाजेपासून ठप्प झाला. तब्बल 21 तास वीज गुल राहिल्याने शहरातील दोन्ही भागांचे रोटेशन 24 ते 26 तास उशिराने होणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. नागरीकांना आता एक दिवस उशिराने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
21 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत
महावितरण व खाजगी ठेकेदार पितांबर पाटील यांनी केबल जोडणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी चमूला बोलावले व मंगळवारी दुपारच्या सुमारास जोडणी झाल्यानंतर साकेगाव उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्था करून उत्तर भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. बिघाड दुरुस्तीच्या ठिकाणी महावितरणचे भुसावळ येथील कार्यकारी अभियंता जयंत भामरे, शहर विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जी.टी.महाजन, तापीनगर सबस्टेशनचे अभियंता गिरीष चौधरी, सतारे कक्षाचे अभियंता अनिमेश काळे, प्रोफेसर कॉलनी कक्षाचे राहूल कवठे हे तळ ठोकून होते.
पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा
कार्यकारी अभियंता जयंत भामरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहराच्या उत्तर भागाला वीजपुरवठा करणार्या 33 केव्हीच्या अंडरग्राऊंड दोन्ही केबल जळाल्याने 21 तास वीजपुरवठा खंडित झाला आहे. नाहाटा क्रॉसिंग ब्रीजजवळ हा बिघाड घडल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी साकेगाव उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारपर्यंत जळालेल्या केबल दुरुस्तीचे काम पूर्णत्वास येईल, असेही त्यांनी सांगितले.