एकाच क्रमांकाची दोन वाहने : एरंडोल पोलिसात एकाविरोधात गुन्हा
Two vehicles with same number : A case against one in Erandol police एरंडोल : एकाच क्रमांकाची दोन वाहने आढळून आल्यानंतर बनावट नंबर प्लेट टाकणार्या संशयिताविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लाकडांनी भरलेले वाहन जप्त केले आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
सार्वे तांडा येथील महेश गबरू राठोड हे ट्रान्सपोर्ट व्यावसायीक आहेत. त्यांच्याकडील वाहनाचा क्रमांक ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी.जी. 5160) असा असताना दुसर्या वाहनावरही हा क्रमांक असल्याची बाब सोमवार, 15 जानेवारी रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास चालक शालिक मधुकर चव्हाण यांच्या लक्षात आली. ही गाडी राष्ट्रीय महामार्गालगत उपसरपंच चहानजीक आढळून आली. चालकाने मालक महेश राठोड यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर एरंडोल पोलिसांना सूचित करण्यात आल्याने पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या वाहनाची पाहणी केली असता त्यात लाकडे भरलेली होती. हे वाहन एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


आपल्या वाहनावरील क्रमांक दुसर्या वाहनावर अनधिकृतपणे टाकून फसवणूक केल्याप्रकरणी महेश राठोड यांनी एरंडोल पोलिसात फिर्याद दिल्यावरून संशयित विजयसिंग धरमसिंग राजपूत (पाटील, रा.खेडीकढोली, ता.एरंडोल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांचय मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, हवालदार सुनील लोहार करीत आहेत.
