मिक्सर भांड्यासह अंर्तवस्त्रात लपवलेले अडीच कोटींचे सोने मुंबईत जप्त
Two and a half crore gold hidden in underwear along with a mixer pot seized in Mumbai मुंबई : सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्करांकडून विविध फंडे वापरले जातात मात्र अत्याधूनिक मशीन्स व यंत्रणेकडील गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली होती. मुंबईत आता सोने तस्करीसाठी चक्क मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्यांनी (डीआरआय) मुंबई विमानतळावर दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडील चार किलो सोने जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या सोन्याची किंमत दोन कोटी 58 लाख रुपये इतकी आहे.
संशयास्पद हालचालीवरून कारवाई
डीआरआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील जेद्दा येथून येणार्या एका विमानाद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याने सापळा रचण्यात आला. दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना बाजूला घेत त्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली. प्रथम या दोघांची वैयक्तिक झडती घेतली असता त्यांच्या अंर्तवस्त्रामध्ये प्रत्येकी एकेक किलो मेणासदृष्य गोठवलेली सोन्याच्या पावडरींची पाकिटे आढळून आली.


चौघांना ठोकल्या बेड्या
संशितयांकडील सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेली तीन मिक्सरची भांडी जास्त जड वाटल्याने अधिकार्यांनी ती फोडली व त्यात आणखी दोन किलो सोने दडविल्याचे आढळून आले. यानंतर या दोघांना अटक करत त्यांची चौकशी केली असता हे सोने स्वीकारण्यासाठी विमानतळा बाहेर दोन लोक आल्याची माहिती त्यांनी अधिकार्यांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत त्या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
