जळगाव रेल्वे स्थानकावर 82 हजारांचा बेवारस गांजा जप्त
82,000 worth of abandoned ganja seized at Jalgaon railway station जळगाव : बेवारस बॅगेत तब्बल 81 हजार 720 रुपये किंमतीचा आठ किलोपेक्षा जास्त गांजा जळगावात जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवार, 16 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही बॅग जळगाव रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर यंत्रणेला आढळली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध मंगळवार, 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता लोहमार्ग रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गस्ती पथकाला आढळली बेवारस बॅग
मंगळवार, 16 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार विनोद साळवे, डी.एच. खैरनार हे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट क्रमांक दोनवर एक ट्रॉली बॅग, लाल व पिवळ्या रंगाची कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळून आली. या विषयी तेथे असलेल्या प्रवाशांना त्यांनी विचारणा केली असता ते साहित्य आपले नसल्याचे त्यांनी सांगितले. बॅग व पिशव्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात नेण्यात आले. या साहित्याच्या मालकाचा शोध घेण्यासाठी या अधिकार्यांनी आजूबाजूला व रीक्षा थांब्याजवळ जावून पाहणी व चौकशी केली मात्र कुणीही पुढे आले नाही त्यामुळे या बॅग व पिशव्यांची तपासणी केली असता त्यात काही तरी अमली पदार्थ असल्याचे लक्षात आले.


अधिकार्यांच्या उपस्थितीत पंचनामा
आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक बी.जी.जाधव, निरीक्षक चंद्रशेखर पालीवाल यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. बॅग व पिशव्यांमध्ये गांजाचे 81 हजार 720 रुपये किंमतीचे आठ किलोपेक्षा जास्त वजनाचे सहा पाकीट आढळून आले. या साठ्याचे नमुने घेऊन ते भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव व निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.
