दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली : आमदार मंगेश चव्हाण


Tribute to Shubham: MLA Mangesh Chavan चाळीसगाव  : काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मुंबई पोलिस दलात कार्यरत असणार्‍या शुभम अनिल आगोणे या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. स्व.शुभम ला न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी चाळीसगाव शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आलेल्या मोर्चात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणही सहभागी झाले. . यावेळी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली असेल, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.

गुन्हेगारी प्रवृत्तींना हद्दपार करणार : आमदार
शुभम मुंबई पोलिस दलात असल्याने मंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्था निमित्ताने त्याची आणि माझी नेहमी भेट होत असायची. मागील वर्षी झालेल्या रायगड वारीत तो आपल्या मित्र मंडळींसह तीन दिवस आमच्यासोबत होता. नुकत्याच झालेल्या नमो चषक स्पर्धेत देखील त्याच्या संघाने सहभाग नोंदवला होता मात्र त्यांचा सामना होण्याच्या आदल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली.



गुन्हेगार हे गुन्हेगार असतात… त्यांना जात, धर्म, पक्ष नसतो… शुभम ची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली ते पाहता अशी गुन्हेगारी प्रवृत्ती हद्दपार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न
मी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार असून लवकरात लवकर सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले.

आज प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हाच संकल्प करूया की अश्या समाजविघातक प्रवृत्तीला कुठल्याही प्रकारचा थारा मिळणार नाही. शुभमला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असे आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !