दीपनगरातील 660 मेगावॅट सुपर क्रिटीकल कोळसाधिष्ठीत प्रकल्प कार्यान्वीत

मार्चपासून व्यवसायीक वीजनिर्मितीचे संकेत : सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच संच


660 MW super critical coal-fired project at Deepnagar commissioned भुसावळ : दीपनगर औष्णिक केंद्रातील तब्बल 4700 कोटींची भांडवली गुंतवणूक असलेला 660 मेगावॅट सुपर क्रिटीकल कोळसाधिष्ठीत प्रकल्प नुकताच प्रकल्प संचालक अभय हरणे यांच्याहस्ते कळ दाबून कार्यान्वित करण्यात आला. सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत हा उत्तर महाराष्ट्रातील पहिला तर राज्यातील चौथा संच आहे. या संचातून मार्च 2024 मध्ये व्यावसायीक वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याची किमान 600 मेगावॅटची तूट भरून निघेल.

उन्हाळ्यात भारनियमन टळण्याचे संकेत
उन्हाळ्यात राज्याला खाजगी उर्जा प्रकल्पातून तसेच केंद्र शासनाकडून 6 रुपये प्रतीयुनिटपर्यंत महागड्या दराने विज खरेदी करावी लागते. या संचामुळे राज्याला अवघ्या साडेतीन रुपये युनिट प्रमाणे वीज उपलब्ध होईल. आगामी काळात राज्यावर भारनियमनाची वेळ आली तर जळगाव जिल्ह्यासारख्या भौगोलिक भागाला पुरवठा करू शकेल, इतकी अतिरिक्त वीज दीपनगर केंद्रात तयार होणार आहे. यामुळे आगामी काळात उन्हाळ्यात भारनियमन झाले तर भारनियमनाच्या झळा कमी होतील.



काय आहे सुपर क्रिटीकल तंत्रज्ञान
सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत दीपनगरातील 660 मेगावॅट प्रकल्प हा महानिर्मितीचा चौथा व उत्तर महाराष्ट्रातील पहिला संच आहे. या तंत्रज्ञानात कोळसा, पाणी इतर संचांच्या तुलनेत कमी लागणार आहे. इंधन इतर संचापेक्षा सरासरी 30 टक्यांनी कमी लागणार असल्याने वीजेच्या अस्थिर आकार कमी होईल. परिणामी ग्राहकांवर पडणारा भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

एफजीडी सोबतचा राज्यातील पहिला संच
महानिर्मितीचा फ्लू गॅस डि-सल्फरायझेशन या तंत्रज्ञानासोबत कार्यान्वित होणारा 660 मेगावॅट संच हा महानिर्मितीचा राज्यातील पहिला संच आहे. एफजीडीमुळे प्रकल्पातून उत्सर्जीत होणार्‍या सल्फरडाय ऑक्साइड (डजु) तसेच नायट्रोजनडाय ऑक्साईड या वायुचे प्रमाण प्रचलित पर्यावरणीय निकषांपेक्षा कमी राहणार असून पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे.

दीड हजार बेरोजगारांना रोजगार
दीपनगर औष्णिक केंद्रातील 660 मेगावॅट प्रकल्पामुळे परिसरातील किमान दीड हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्योगधंदे वाढीसाठी चालना मिळणार आहे. यासोबतच महानिर्मितीकडून प्रकल्पबाधीत गावांतील 200 बेरोजगारांना मानधनासह प्रशिक्षण योजना सुरु केली जाणार आहे. यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.

मार्चमध्ये होणार व्यवसायीक वीज नर्मिती
660 मेगावॅट संच सध्या कार्यान्वित करण्यात आला असून आगामी काळात त्याच्या विविध चाचण्या मे.भेल कंपनीकडून केल्या जाणार आहेत. यानंतर मार्च 2024 मध्ये या संचातून वाणिज्य अर्थात व्यवसायीक तत्वावर विजेची निर्मिती होणार आहे. या काळात सलग 72 तास संच पूर्ण अर्थात 660 मेगावॅट क्षमतेनेही चालविला जाणार आहे.

व्यवस्थापकिय संचालकांनी दिली भेट
संच कार्यान्वित झाल्यानंतर गुरुवारी महानिर्मितीचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी 500 मेगावॅट व 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कोळसा हाताळणी विभागाची पाहणी केली. तसेच आढावा घेवून उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देश दिले. उर्जामुठ या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी संचालक पंकज नागदेवेते, कार्यकारी संचालक राजेश पाटील, मुख्य अभियंता मोहन आव्हाड, प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे आदी उपस्थित होते.

पूर्ण क्षमतेने होईल वीजनिर्मिती
दीपनगरातील 660 मेगावॅट प्रकल्प कार्यान्वितीकरण हा एक टप्पा आहे. यानंतर वीजनिर्मिती प्रकल्प आगामी काळात हा संच कार्यान्वित होईल. येणार्‍या प्रत्येक दिवशी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. संच प्रायोगिक तत्वावर चालवून 43 मेगावॅट वीज उत्पादनासह ग्रीडला जोडण्यात यश आल्याचे व्यवस्थापकिय संचालक डॉ.पी.अनबलगन म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !