कुविख्यात घरफोडे रामानंदनगर पोलिसांच्या जाळ्यात
Notorious burglaries in Ramanandnagar police net जळगाव : रामानंदनगर पोलिसांनी कुविख्यात घरफोड्यांच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींनी जळगाव शहरासह बुलढाणा जिल्हा व मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात चोर्या केल्या आहेत. चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रीक्षा जप्त करण्यात आली. जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (60, रा.नांदुरा, जि.बुलढाणा) व सैय्यद अफसर सय्यद अजगर (22, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दोन गुन्ह्यांची उकल : आणखी गुन्हे उघडकीस येणार
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची गोपनिय माहिती रामानंदचे हवालदार सुशील चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना मिळताच सोमवारी 22 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत यांनी कारवाई करत संशयित आरोपींना अटक केली. त्याांचा एक साथीदार हा पसार झाला आहे. त्यांनी घरफोडी करण्याकरीत वापरलेली रीक्षा देखील जप्त केली आहे. तपास हवालदार जितेंद्र राजपूत हे करीत आहे.


यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक विठ्ठल पाटील, हवालदार जितेंद्र राजपूत, हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, हवालदार इरफान मलिक, नाईक हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी आदींनी ही कारवाई केली.
