राष्ट्रवादी सत्तेत जाताच रखडलेल्या कामांना गती : भुसावळात जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे
Stalled works will be speeded up as soon as NCP comes to power: Bhusawalat District President Umesh Nemade भुसावळ : राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाताच स्थानिक पातळीवर रखडलेल्या कामांना गती मिळाली. आता विकासरुपी जगन्नाथाचा रथ तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली चौफेर उधळत राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केला. भुसावळ तालुका राष्ट्रवादीची आढावा बैठक शहरातील सुरभी नगर येथील संपर्क कार्यालय आवारात मंगळवारी झाली. त्यात मार्गदर्शन करताना उमेश नेमाडे बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, युवती उत्तर महाराष्ट्र प्रभारी जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, अतुल चव्हाण उपस्थित होते. भुसावळ तालुका व विभागात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे. पक्षाचा विचार मनामनात रुजवावा, असे आवाहन या बैठकीत उपस्थित नेत्यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, माजी नगरसेवक शेख मुश्ताक, शिंदीचे सरपंच संदीप सपकाळे, वराडसीमचे विलास पाटील, किन्हीचे माजी उपसरपंच प्रदीप कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








