जळगावात 50 हजारांचा सुगंधित पानमसाला व तंबाखू जप्त
50 thousand aromatic panmasala and tobacco seized in Jalgaon जळगाव : शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरीत्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणार्या एकावर मंगळवारी दुपारी 12 वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली. 46 हजार 620 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शनीपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोर एकजण दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ए.डब्ल्यू.8047) वरून बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाला. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शरद पाटील यांनी शनीपेठ पोलीसांच्या मदतीने कारवाई करत दुचाकीधारकाची चौकशी केली असता त्याने राजेश गुरुमुख दास रामचंदानी (47, सिंधी कॉलनी, जळगाव) असे नाव सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतून एक पाकीट काढले असता त्यामध्ये सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आढळून आले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन व शनीपेठ पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळ असलेला 26 हजार 620 रुपये किमतीचे सुगंधित पान मसाला व तंबाखू आणि 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 46 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याप्रकरणी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश गुरुमुखदास रामचंदानी याच्या विरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास योगेश माळी करीत आहे.
