भुसावळ शेतकी संघात फुलले कमळ : माजी आमदार चौधरींचा दारुण पराभव
आमदार संजय सावकारे यांची चालली जादू : चौधरी यांच्या गटाला चार जागा
Lotus blossomed in the Bhusawli Farmers’ Union: Former MLA Chowdhury’s heavy defeat भुसावळ : भुसावळ शेतकी संघाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांची जादू चालली असून त्यांच्या पॅनलला तब्बल 11 जागांवर यश मिळाले तर आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह माजी आमदार संतोष चौधरी यांना कृउबा निवडणुकीप्रमाणे येथेदेखील दारुण अपयशाला सामोरे जावे लागले असून अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. तब्बल 20 वर्षांपासून ताब्यात असलेला एकमेव शेतकी संघ माजी आमदार चौधरी यांच्या हातातून आता गेल्याने चौधरींसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.
20 वर्षानंतर शेतकी संघात फुलले कमळ
शेतकरी संघाच्या निवडणूकीत संस्था सभासद गटातून शेतकरी पॅनलकडून शिवाजी ढोले (38), तुषार पाटील (38), ज्ञानदेव झोपे (36), सुनंदा बोंडे (35) व गोपाळ पाटील (34) हे उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलकडून प्रकाश चौधरी (36) व भगवान रोनखेडे (34) हे उमेदवार निवडून आले. या गटात चार उमेदवारांना समान 34 मते मिळाली होती. यातून भगवान रोनखेडे व गोपाळ पाटील या दोघांचा ईश्वरचिठ्ठीने विजय झाला. संस्था सभासद गटात सहकार पॅनलला दोन तर शेतकरी पॅनलला पाच जागा मिळाल्या.


या उमेदवारांनी मिळवला विजय, कंसात मते
व्यक्तीशा सभासद गटात निळकंठ भारंबे (545), सुशील झोपे (500), अशोक सरोदे (496) हे भाजपचे शेतकरी पॅनलचे उमेदवार निवडून आले तर महिला राखीव गटातून शेतकरी पॅनलच्या संगीता भोळे (574) व राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलच्या प्रमिलादेवी पाटील (537) विजयी झाल्या इतर मागासवर्ग गटात राष्ट्रवादी सहकार पॅनलचे शुभम जावळे (619), अनूसूचित जाती जमाती गटात शेतकरी पॅनलचे प्रशांत सुकदेव निकम (598), विजाभज व विमाप्र गटात शेतकरी पॅनलचे संग्रामसिंग पाटील (576) मतांनी निवडून आले.
निकालाची उद्घोषणा अन गुलालाची उधळण
रविवारी शहरातील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता बी.व्ही.खाचणे हॉलमध्ये मतमोजणी झाली. निवडणूक अधिकार्यांकडून निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपा समर्थक विजयी उमेदवारांच्या अंगावर कार्यकर्त्यांनी गुलाल टाकून जल्लोष केला. यावेळी आमदार संजय सावकारे आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आमदारांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक व्ही.एम.जगताप होते. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सहकार अधिकारी मनोज चौधरी काम पाहत आहेत.






