भुसावळ शहरावर आता तिसर्या डोळ्याची नजर
भुसावळ शहरावर 442 सीसीटीव्हींचा वॉच : वाहनांचे क्रमांकही होणार स्कॅन
Bhusawal city now has a third eye view भुसावळ : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून व आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 442 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्यापैकी 319 कॅमेरे बाजारपेठ तर 123 कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवण्याचा प्रस्ताव आहे. शहरातील अनेक भागातील सीसीटीव्ही बंद पडल्याने ही बाब गुन्हेगारांच्या पथ्थ्यावर पडली होती मात्र शहराच्या चौफेर आता कॅमेरे बसणार असल्याने गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यासह अप्रिय घटना रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
अत्याधूनिक कॅमेरे रोखणार गुन्हेगारी : कृष्णात पिंगळे
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, 360 अंश व नाईट मोडवर सुस्पष्ट चित्रीकरण हे नवीन कॅमेर्यांचे वैशिष्ट्य असेल. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठे सहायकारी ठरणार असल्याची माहिती भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.


या जागी बसणार अत्याधूनिक कॅमेरे
शहर पोलिस ठाणे हद्दीतील हंबर्डीकर चौक, ओकारेश्वर मंदिर, महाराणा प्रताप चौक, न्यायालय परीसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, पोलिस वसाहत, सेंट अलॉयसेस हायस्कूल, पंचमुखी हनुमान मंदिर, वाल्मीक नगर, कुंभारवाडा, मरीमाता मंदिर, आराधना कॉलनी, लोणारी हॉल, भोई नगर, स्वामी विहार दत्त नगर, कोटेचा कॉलेज, कोटेचा स्कूल, पालिका परीसर, सेंट्रल रेल्वे स्कूल, नारखेडे विद्यालय, राहुल नगर, ताप्ती क्लब, रेल्वेने नॉर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर भागात सीसीटीव्ही लावण्यात येतील.
बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील खडका चौफुली, रजा टॉवर, बसस्थानक, नाहाटा चौक, शिवाजी नगर चौक, वांजोळा रोड, मातृभूमी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमरदीप चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, स्टेशन चौकी, पांडुरंग टॉकीज, एसबीआय शाखा, वाल्मीक नगर चौक, मोटुमल चौक, दीनदयाल नगर, आनंद नगर (एसबीआय), सिंधी कॉलनी गेट, पुंडलिक बर्हाटे शाळा, जामनेर रोड, श्रद्धा नगर चौक, डीवायएसपी कार्यालय, पंधरा बंगला, बुद्ध विहार इत्यादी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
पाठपुराव्याला आले यश : आमदार संजय सावकारे
भुसावळ शहर मिश्र लोकवस्तीचे शहर आहे. शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून व्यक्तिशः पाठपुरावा सुरू होता. त्याला आता यश आले आहे. भुसावळ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागरीकांची सुरक्षा विशेषतः महिला सुरक्षा, पोलिसांचा गुन्हे तपास, गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंध तसेच कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे इत्यादीमध्ये या सीसीटीव्ही प्रकल्पाचा हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय सावकारे यांनी दिली.






