मूळ राष्ट्रवादी अजित पवारांचीच : दोन्ही गटाचे आमदार पात्र
Original Nationalist Ajit Pawar : MLAs of both groups are eligible मुंबई : शिंदे गटाचीच शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा देणार्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी नेमकी कुणाची? यावर निर्णय देताना अजितदादा पवारांची राष्ट्रवादी मूळ असल्याचा निर्णय देत दोन्ही गटातील सर्व आमदारांना पात्र ठरवले. पक्षघटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय दिल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शरद पवार गटाने 10 व्या परिशिष्टाचा गैरवापर करू नये : नार्वेकर
10 व्या सूचीकडे मी कॅलिडोस्कोपद्वारे पाहिलं. युती, आघाडी होतात किंवा तुटतात हे राजकारण आहे. सर्वच कृत्ये किंवा आचरण हे पक्षांतर मानले जाऊ शकत नाही. शरद पवार गटाने 10 व्या परिशिष्टाचा गैरवापर करू नये, अशी महत्त्वाची टिप्पणी नार्वेकर यांनी केली.


अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही
29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान नव्हतं. परंतु 30 जून रोजी त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देऊन नव्या अध्यक्षाची निवड झाली. दोन्ही गटाच्या वतीने घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड झाली नसल्याचा दावा करण्यात आला. आपला अध्यक्ष कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी दोन्ही गटाकडून समांतर पुरावे सादर करण्यात आले. परंतु अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही, असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
नार्वेकरांकडून अपेक्षा ती काय करणार : सुप्रिया सुळे
हा कॉपी पेस्ट निकाल आहे. शिवसेनेचे नाव बदलून राष्ट्रवादीचे दिले आहे. स्थानिक पक्षांची गळचेपी सुरू आहे. भाजपाला कोणताही स्थानिक पक्ष मोठा होताना पाहवत नाही. यामुळे आयकर, सीबीआय, ईडीला मागे लावायचे आणि गळचेपी करायची हा प्रकार सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
अदृष्य शक्तीच्या आदेशावरून निकाल देण्यात आला आहे. कायदे नियम, संविधान मोडून काम सुरू आहे. राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, असा आरोप सुळे यांनी केला आहे. मी निकाल वाचन पाहिले नाही. कारण शिवसेनेवेळी पाहिले होते. यामुळे मला हे अपेक्षितच होते, असेही सुळे म्हणाल्या.






