भुसावळ शहरात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू : ट्रक चालकाविरोधात गुन्हा
Two bikers killed in Bhusawal city : Crime against truck driver भुसावळ : शहरातील खडका चौफुलीवर भरधाव ट्रकने चिरडल्याने दोघा दुचाकीस्वारांचा जागीच करुण अंत झाला होता. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला होता. अपघातप्रकरणी ज्ञानेश्वर ममराज राठोड (40, सुभाषवाडी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक श्याम बाबू (55, आग्रा, उत्तरप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
जागीच दोघांचा ओढवला मृत्यू
दीपनगरहून जळगावकडे निघालेल्या दुचाकी (एम.एच.19 डी.एन.0608) ला पाठीमागून भरधाव वेगाने आलेला ट्रक (आर.जे.11 जी.ए.9903) ने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील जितेंद्र सवजी राठोड (38, सुभाषवाडी, जळगाव) व प्रकाश उखा तव्वर (45, डोहरीतांडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, दोघा दुचाकीस्वारांचा मेंदूच अपघातात बाहेर आला तर ट्रकच्या पुढील भागात दुचाकी अडकली. जमाव मारहाण करीत या भीतीने ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक पळवत नेला मात्र नशिराबादनजीक ट्रक चालकाला पकडण्यात यंत्रणेला यश आले. ट्रक चालक श्याम बाबू (55, आग्रा, उत्तरप्रदेश) यास अटक केल्यानंतर त्यास बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर क्रेनद्वारे दुचाकी बाहेर काढल्यानंतर ट्रक बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, अपघातात ठार झालेल्या दोघांच्या मृतदेहाचे ट्रामा सेंटरमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


युपीतील ट्रक चालकाविरोधात गुन्हा
पट्रक अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ज्ञानेश्वर राठोड (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक श्याम बाबू (55, आग्रा, उत्तरप्रदेश) याच्याविरोधात भादंवि 304 (अ), 279, 337, 338 व मोटार व्हेईकल अॅक्ट 184, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र लोटू पाटील करीत आहेत.
