मुक्ताईनगर पर्यटन क्षेत्रासाठी 50 कोटींचा निधी : मुख्यमंत्र्यांची घोषणा
मेंढोळदे ते सुलवाडी पूलाचे भूमिपूजन
50 crore fund for Muktainagar tourism sector : Chief Minister’s announcement मुक्ताईनगर : उद्योगधंद्यांमध्ये आपले काय ? म्हणून यांनी हिस्सेवारी मागितल्याने राज्यातील उद्योग-धंदे बाहेर गेले मात्र शिंदे सरकारच्या काळात पाच लाख कोटींचे करारनामे करण्यात आले. राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून उंटावर शेळ्या हाकणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा नाही तर फेस टू फेस बोलणारा मुख्यमंत्री असल्याचे शिंदे यांनी येथे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर पर्यटन क्षेत्रासाठी 50 कोटींचा निधी देण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर करीत असल्याची घोषणा यावेळी केली. सरकारच्या वतीने पैसे दिले जातील व आगामी अर्थकसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल व बोदवड सिंचना योजना टप्पा दोनचे टेंडर काढण्याच्या सूचना करीत असल्याचे ते म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला जोडणार्या मेंढोळदे ते सुलवाडी या पुलाचे भूमिपूजन सोमवार, 4 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याहस्ते झाले. भूमिपूजनानंतर मेंढोळदे गावानजीक आयोजित कार्यक्रत ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, नंदकिशोर महाजन
आदींची उपस्थिती होती.



बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती, तेच आमचे ऐश्वर्य
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी कार्यक्रमातून चार कोटी लोकांना लाभ देण्यात आला आहे मात्र विरोधकांना पोटदुखी उठली आहे व या पोटदुखीसाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला आहे व त्यातून पोटदुखीवर मोफत औषध दिले जात आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी व मोहापायी तुम्ही काय मिळवले? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला. स्व.वीर सावरकरांचा अपमान तुम्ही मूग गिळून सहन केला मात्र आमच्यातील बाळासाहेबांचा विचारांचा सैनिक जागे केल्याने आम्ही उठाव केला, असे ते म्हणाले. आज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत मात्र आम्ही विकासकामातून उत्तर देणार, असेही ते म्हणाले.
मी तर जमिनीवरचा कार्यकर्ता
मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्यात देण्याची दानत कधीच नव्हती केवळ घेण्याची दानत तुमच्यात होती. ना उमेद करण्याचे काम तुम्ही केले मात्र एकनाथ शिंदे हा काटा नाही तर कार्यकर्ता आहे व कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याचे सांगून ते म्हणाले की, सत्तेसाठी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही मात्र तुम्ही ती केली. त्यावेळी त्यांनी वारंवार सरकार पडणार असल्याच्या वल्गना केल्या मात्र सरकार अधिकच मजबूत झाले.





