वरणगावातील पाणीप्रश्न सोडवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
Collector’s order to solve the water problem in Warangaon वरणगाव : वरणगाव शहरात 18 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहता नवीन नारी मळा, शिवाजी नगर भागातील जलकुंभ सुरू करावा या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार संजय सावकारे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली होती. या मागणीची दखल घेत तातडीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे यांनी वरणगाव नगरपरीषदेत बैठक घेतली. वरणगाव शहरातील पाणी समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशासनाला त्यांनी दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, नाना चौधरी, संतोष कश्यप, शामराव धनगर, डॉ.नाना चांदणे, रमेश पालवे, गोलू राणे, राहुल जंजाळे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करावे, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले. त्याबद्दल वरणगावकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील मंजूर पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने झाले पाहिजे तसेच शहरात भूमिगत गटार प्रकल्प व सांडपाणी प्रकल्प मंजूर करावेत, छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथे शिवसृष्टी निर्माण करण्यासांठी निधी द्यावा, भोगावती नदीमध्ये संपूर्ण शहरातील सांडपाणी येत असल्याने ते बंद करून त्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी तसेच तिरंगा सर्कल चौक सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कल या रस्त्यात दुभाजक व लाईट लावण्यात यावे आदी मागण्या केल्या.








