वीज चोरी रोखण्यासाठी पाऊल : भुसावळातील ग्राहकांचे वीज मीटर आता खांबावर !
वीज गळती रोखण्यासाठी महावितरणचे उत्तर भागातून पाऊल
Electricity meters of consumers in Bhusawal now on poles भुसावळ : वीज चोरी हा महावितरण पुढील यक्ष प्रश्न असलातरी वीज वितरण कंपनीकडून सातत्याने विजेची हानी रोखण्यासाठी विविध उपाय अवलंबले जातात. वीज खांबावरून होणारी वीज चोरी रोखण्यासाठी एरीयल बंच केबल टाकल्यानंतर आता वीज मीटरमध्ये होणारी छेडछाड रोखण्यासाठी उत्तर भागातील वीज ग्राहकांकडील वीज मीटर आता खांबावर लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या भागात वीज चोरी तसेच विजेची हानी अधिक आहे, अशा भागात वीज वितरणने कामाला सुरूवात केली आहे. एकूण तीन हजार सहाशे वीज मीटर खांबावर बसवले जात आहेत. वीज गळती रोखण्यासह विविध भागांमधील वीज मीटरमधील फेरफार आता थांबणार आहे.
ग्राहकांकडील वीज मीटर आता खांबावर
शहरात विजेच्या गळतीचे प्रमाण अधिक असून वीज मीटरमधील फेरफार वीज कंपनीसाठी डोकेदुखीचा विषय आहे. वीज हानी टाळण्यासाठी महावितरणने वीज हानी अधिक असलेल्या भागांमधील ग्राहकांच्या घराच्या दरवाजाबाहेर लावलेले वीज मीटर आता विजेच्या पोलवरील एका बंदिस्त पेटीत लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व परिसरात हानी अधिक असलेल्या 300 पोलवर जोडणी असलेले तब्बल तीन हजार सहाशे वीज मीटर काढून ते पोलवरील बॉक्समध्ये बसविले जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दक्षिण भागातील ही प्रक्रिया संपल्यानंतर आता महावितरणने उत्तर भागातील वीज हानी अधिक असलेल्या भागातील वीजमिटर एका ठिकाणी पोलवर बसविण्याचे काम सुरू केले आहे. वीज मीटर खांबावर आल्यानंतर विजेची चोरी रोखली जाईल, अशी शक्यता आहे.



