भुसावळ ते फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ दुचाकीला कंटेनरची धडक, दोन जखमी
यावल : भुसावळ ते फैजपूर रस्त्यावर भोरटेक गावाजवळील हॉटेल सहाराच्या पुढील वळणावर एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक तेथून फरार झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातानंतर कंटेनर चालक पसार
भुसावळ ते फैजपूर रोडवर भोरटेक गाव आहे. या गावाच्या शिवारात हॉटेल सहारा आहे. या हॉटेल्स साहाराच्या पुढील वळणावर रस्त्याच्या कडेला दुचाकी (क्रमांक एम.एच.48 सी.झेड. 1150) घेऊन निलेश गंगाराम राखुंडे (19, रा.सिद्धेश्वर नगर, वरणगाव) व राकेश जहारीया बारेला (28, रा.नेपानगर, ता.बर्हाणपूर) हे उभे होते. त्यांना शेखर कैलास विश्वकर्मा (रा. आष्टा, ता.जि.सीहोर, मध्यप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक एम.एच.39 ए.डी. 5731) द्वारे मागून धडक दिली. .

या अपघातामध्ये निलेश राखुंडे व राकेश बारेला दोघे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक तेथून फरार झाला. फैजपूर पोलीस ठाण्यात सागर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे.