दलित, वंचित, शोषित घटकातील चार लाख बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार : संजय ब्राह्मणे

भुसावळात वंचित आघाडीचा मेळावा : भाजपासह महाविकास आघाडीवर चालवले टिकेचे बाण


Four lakh unemployed people from Dalit, deprived and exploited groups will be provided employment opportunities: Sanjay Brahmne  भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. गेल्या दहा वर्षात कुठल्याही समस्या सुटल्या नाहीत. हा पट्टा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो मात्र केळी कामगार अद्यापही नोंदणीकृत नाहीत म्हणून त्यांची आधी नोंदणीकृत कामगार म्हणून नोंद करणार, मतदारसंघातील दलित, वंचित, शोषित घटकातील चार लाख बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी येथे दिले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राउंडवर) शुक्रवारी दुपारी 12 वाजता आयोजित वंचित आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, भारीपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, जिल्हा महासचिव योगेश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष मौलाना इम्रान तडवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


रेल्वे अतिक्रमितांना न्याय देणार
भुसावळातील रेल्वेच्या जागेत राहणार्‍या कष्टकर्‍यांना कोच फॅक्टरी उभारण्यात येत असल्याच्या नावाखाली बाहेर काढण्यात आले मात्र त्यांच्या निवार्‍याची अद्यापही व्यवस्था करण्यात आलेली नाही. रावेर लोकसभेत निवडून आल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. दलित, वंचित घटकांतील तरुणांसाठी मोठे कॉलेजस उभारण्यात येतील, अशी ग्वाही उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी दिली.

धरणांचा गाळ काढणार, बेरोजगारांना नोकर्‍या देणार
चार लाख बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी वंचित कटीबद्ध असल्याचे ते ब्राह्मणे म्हणाले. रेल्वे अ‍ॅप्रेंटीस कामगारांना रोजगार मिळण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी असल्याचेही ब्राह्मणे म्हणाले. या परिसरात मोठ-मोठी धरणे असून त्यांचे पाणी वाहून जाते मात्र धरणातील गाळ केवळ कागदोपत्री काढला जातो मात्र वंचितला संधी मिळाल्यास गाळाचा प्रश्न मार्गी लावून हे पाणी सिंचनासाठी उपयोगात आणले जाईल व त्या माध्यमातून शेतकर्‍यांची भराभराट होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

भाजपा-महाविकास आघाडीवर टिका
गेल्या दहा वर्षात रावेर लोकसभा मतदारसंघात कुठलाही विकास झालेला नाही तर चारकामेदेखील विकासाची सांगता येणार नाही, अशी स्थिती असल्याची टिका ब्राह्मणे यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर केली तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी 15 दिवसात तीन पक्ष बदलल्याची टिकाही त्यांनी केली. आजची सभा ही माझ्या प्रचाराची सभा नसून वंचित समाजाच्या एल्गाराची सभा असल्याचे उमेदवार संजय ब्राह्मणे म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !