भाजपा सरकारच्या काळात राज्यातील उद्योग गुजरातला पळवले : भुसावळात जयंत पाटील
महाविकास आघाडीचा मेळावा : श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन
Mahavikas Aghadi meeting: Appeal to Shriram Patil to win भुसावळ : भाजपा सरकारच्या काळात देशातील उद्योग गुजरात राज्यात पळवून बेरोजगारी वाढवण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुसावळात केला. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी संतोषीमाता सभागृहात झालेल्या सभेत ते बोलत होते.
उद्योग पळवण्याच्या विषयावर पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांचे मौन
कोरोना काळात सर्वात चांगले काम उद्धव ठाकरे सरकारने केले मात्र सरकार पाडण्यात आले मात्र आता त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. देशात व राज्यात मोदी सरकारविषयी प्रचंड संताप आहे. महागाईचा आलेख वाढला आहे, शेतकर्यांचा खर्च दुप्पट करण्यात आल्याने शेतकरी संतप्त आहेत, उद्योग गुजरातला पळवून नेले जात असताना पीएम, गृहमंत्री काहीच बोलायला तयार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीला संधी द्या
जयंत पाटील म्हणाले की, जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही केली मात्र त्यांनी (भाजपाने) नकार दिला मात्र आम्ही सत्तेवर आल्यावर ही मागणी पूर्ण करणार आहोत. गरीबांना वर्षाकाठी खात्यात एक लाख रुपये देण्यात येतील, उच्चशिक्षीत बेरोजगारांना स्टायपेंड दिली जाईल, शेतकर्यांवर लादलेले सर्व कर रद्द करू, असेही जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
यांची विचार मंचावर उपस्थिती
राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार, महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार श्रीराम पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, प्रतिभा शिंदे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





