महिलांना गंडवणारा धुळ्यातील भामटा जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी : अनेक गुन्हे येणार उघडकीस
जळगाव : महिलांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांच्या गळ्यातील दागिने लांबवणार्या भामट्याच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशोक सुरेश दहेकर (40, रा.मोगलाई, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
फसवणुकीचा गुन्हा उघड
15 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी फुले मार्केटच्या बाजुला मसाला गल्लीत तुळसाबाई चौधरी (72) या वृद्धेला आरोपी अशोक दहेकर यांनी थांबवत पुढे गरीब महिलांना साड्यांसह बांगड्या व 251 रुपयांचे वाटप केले जात असल्याने तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत व चप्पल पिशवीत ठेवण्याचे सांगितल्यानंतर संशयीत निघून गेला तर तक्रारदार चौधरी यांनी पिशवी पाहिल्यानंतर सोन्याची पोत गायब असल्याचे लक्षात आल्याने गुन्हा नोंदवण्यात आला होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक पाटील, हवालदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, हवालदार सुनील दामोदर, मनोज दुसाने, किरण चौधरी, प्रवीण हिवराळे, परेश महाजन यांनी शुक्रवारी आरोपीच्या मुसक्या आवळत त्यास जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.




