जनजागृतीसाठी प्रशासन झटले : गतवेळच्या तुलनेत पाच टक्के मतदान वाढले

अधिकारी राबूनही भुसावळ विधानसभेत मतदार राजा नाराजच : सुटीचा उपयोग पर्यटनासाठी


भुसावळ : रावेर लोकसभेसाठी सोमवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक झाली. रावेर लोकसभेत एकूण 63.01 टक्के मतदान झाले तर भुसावळ विधानसभेत 57.33 टक्के मतदान झाले. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भुसावळ मतदारसंघात 52 टक्के मतदान झाले होते व यंदा मतदान सुमारे पाच टक्के वाढून 57.33 टक्क्यांवर पोहोचले. असे असलेतरी रावेर विधानसभेत सर्वाधिक मतदान झाल्याचे पहायला मिळाले मात्र रावेर लोकसभेतील सहा मतदारसंघाचा विचार केल्यास भुसावळात तुलनेत कमी मतदान झाले. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असूनही मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडले नाहीत. मतदानाच्या दिवशी शासकीय कर्मचार्‍यांना सुटी देण्यात आली असलीतरी मतदारांनी मात्र सलग आलेल्या सुट्यांचा लाभ घेत पर्यटनवारी करीत मतदानाला मात्र ‘खो’ दिला. मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रशासन दिड महिन्यापासून झटूनही मतदारराजा मात्र नाराज असल्याचे दिसून आले.

भुसावळ विधानसभा मतदारसंघात कमी मतदान
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, चोपडा विधानसभा मतदारसंघात 62.33,
रावेर विधानसभेत 70.81, जामनेर विधानसभेत 63.33, मुक्ताईनगर विधानसभेत 64.87 तर मलकापूर विधानसभेत 67.38 टक्के मतदान झाले मात्र भुसावळ विधानसभा मतदारसंघात मात्र 57.38 टक्के मतदान झाले. वरील पाच विधानसभा मतदारसंघापैकी भुसावळात विधानसभेत मतदान कमी झाले मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा पाच टक्क्यांनी मतदानाचा आकडा वाढलेला दिसून आला. मतदानाचा टक्का वाढीसाठी दीड महिना अधिकार्‍यांनी जनजागृती करूनही मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. राजकीय पक्षांपेक्षाही प्रशासनाकडे मोठी आणि सक्षम यंत्रणा असतानाही ती यंत्रणा मतदारांपर्यंत पोहचलीच नाही का ? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.


मतदान केंद्रावर सर्वोर्तापरी सुविधा
यंदा प्रशासनातर्फे मतदारराजासाठी ओरएस पाकिट, मेडिकल सुविधा, व्हीलचेअर तसेच लहान मुले सांभाळण्यासाठी खेळण्यांची तसेच आशा वर्करची नियुक्ती करण्यात आली होती तसेच उन्हाचा फटका बसू नये यासाठी मंडप व पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली. लाखो रुपयांचा खर्च मतदारांच्या सुविधेवर करण्यात आल्यानंतरही मतदारांनी मात्र फारसा उत्साह दाखवला नाही.

मतदार यादीचा घोळ कायम
निवडणुकीच्या आठ दिवस आधीच बीएलओ यांना मतदारांच्या घरांपर्यंत स्लीप वाटपाचे आदेश प्रशासनाने दिले होते मात्र अनेक भागातील मतदारांना अखेरच्या दिवसांपर्यंत वोटर स्लीप मिळाल्याच नाहीत त्यामुळे मतदारांना मतदान नेमके कुठल्या केंद्रावर ? याचा अंदाज आला नाही शिवाय मतदार यादीतदेखील घोळ झाल्याचा आरोप यावेळी मतदारांकडून करण्यात आला. अनेक मतदारांची नावे अन्य केंद्रावर गेल्याचा आरोप मतदारांनी यावेळी केला मात्र त्यामुळेदेखील मतदानावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !