भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी आवारातून लोखंडी ग्रील चोरीचा प्रयत्न
भुसावळ : सुरक्षा रक्षकांचा 24 तास खडा पहारा असतानाही शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरी आवारातून दोन हजार रुपये किंमतीची लोखंडी ग्रील लांबवण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवार, 13 रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चोरट्यांना हटकल्यानंतर संशयीत त्यांची दुचाकी सोडून पसार झाले. याप्रकरणी शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ ऑर्डनन्सचे सुरक्षा तुकाराम दत्तात्रय शिंगटे (55, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री पावणेअकरा वाजता संशयीत आकाश श्रीओम बोरसे (चांदमारी चाळ, भुसावळ) व शुभम कैलास शिंगारे (सुभाष नगर, भुसावळ) हे ऑर्डनन्स फॅक्टरी रस्त्यावरून दोन हजार रुपये किंमतीचे लोखंडी ग्रील दुचाकीवरून नेत असताना त्यांना हटकल्यानंतर संशयीत दुचाकी व ग्रील सोडून पसार झाले. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पालवे करीत आहेत.
