चिनावलला संचारबंदीने जनजीवन विस्कळीत : दुध डेअरी, किराणा दुकाने बंदने हाल
20 पर्यंत संचारबंदी : गावात तणावपूर्ण शांतता : हरिनाम सप्ताहात खंड : हल्लेखोरांकडून दुचाकीचे नुकसान
सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे किरकोळ कारणावरून सुरू असलेल्या भांडणानंतर जोरदार दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तणावग्रस्त करण्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. सावदा पोलिसांनी धाव घेत वातावरण निवळले. याप्रकरणी रात्री उशिरा चार संशयीतांसह इतर जमावाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्च ऑपरेशनद्वारे संशयीतांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गावातील तणावाची स्थिती पाहता 20 मे च्या रात्री 12 पर्यंत गावात संचारबंदी जारी करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान संचारबंदीत शिथिलता देण्यात आली असलीतरी किराणा दुकाने व दुध डेअरी बंद असल्याने ग्रामस्थांचे चांगलेच हाल झाले.
किरकोळ वादातून तुफान दगडफेक
चिनावल येथे किरकोळ कारणावरून समाजकंटकांनी गावात एकमेकांच्या अंगावर धावून जात दगडफेक केल्याने महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे गावातील शेकडो स्त्री-पुरुष रस्त्यावर उतरले व पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडून दगडफेक करणार्यांना अटक करण्याची मागणी केली. या घटनेची माहिती सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह आपल्या फौजफाट्यासह दाखल झाल्या व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल
शुक्रवारी रात्री उशिरा माधुरी महाजन (चिनावल) या महिलेने सावदा पोलिसात तक्रार दाखल केली. शुक्रवारी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान मी वॉकिग करीत असताना वाघोदा रोड ते मेस्को मळा परिसरात मोठ्याने आरडाओरड चालू असल्याचा आवाज येत असल्याने मी व माझे सोबत असलेली वर्षा महाजन यांच्याकडे मोठा जमाव दगडफेक करीत पळत आला व स्त्री मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. महादेव वाडा, महाजन वाडा परिसरात दगडफेक करीत मोटरसायकलचे नुकसान करण्यात आले तसेच दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडण्यात आले. महिलेने चौघांचे नाव तक्रारीत नमूद केले असून दिडशे ते दोनशे जणांच्या अनोळखी जमावाविरोधात तक्रार नोंदवली आहे. गुरनं.006/24 अन्वये भादंवि कलम 392, 354 व 427 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
20 मे पर्यंत संचारबंदी
चिनावल गावातील तणावाचे वातावरण पाहता फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव यांनी 18 मेच्या मध्यरात्रीपासून 20 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचा आदेश पारित केले आहेत. शुक्रवार, 18 रोजी गावात पूर्णपणे व्यवहार बंद होते तर संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात जाणारे शेतमजूर, दैनंदिन उघडणारे आस्थापने, किराणा, दुध डेअरी बंद असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली तर सर्वच रस्त्यावर शुकशुकाट जाणवला. गावात स्थानिक सावदा पोलिसांसह फैजपूर, निंभोरा, रावेर येथून अतिरिक्त कुमक तसेच राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, एपीआय जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गर्जे हे तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणाव कायम आहे. सावदा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी चिनावल गावात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
सप्ताहात पडला खंड
चिनावल गावातील एका भागात हरिनाम अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते परंतु संचारबंदी लागल्याने या सप्ताहातही खंड पडला आहे.
संचारबंदीतून शेतकर्यांना मिळावी मुभा
चिनावल गावात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहेत. संचारबंदी लागू झाल्याने शेती व गाव निर्मनुष्य झाले आहेत. अनेक शेतकर्यांच्या शेतात काढणीयोग्य केळी तयार आहे. संचार बंदीमुळे घराबाहेर निघणे शक्य नसल्याने अनेक शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासाठी केळी कापणीसाठी तरी किमान संचार बंदीतून मुभा मिळावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.