भुसावळात 30 अनधिकृत बॅनर्स हटवले : स्ट्रक्चरल ऑडीट नसलेल्या 17 एजन्सीधारकांना नोटीस


भुसावळ : वादळी वार्‍यांमुळे मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डींग कोसळून 75 पेक्षा अधिक जण जखमी झाले तर 14 जणांचा मृत्यू ओढवला. या घटनेनंतर शहरातील होर्डींगचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पालिकेने सोमवारी व मंगळवारी यावल रोडवरील 30 अनधिकृत लहान बॅनर हटवले तर स्ट्रक्चरल ऑडीट नसलेल्या तसेच धोकेदायक होर्डींग लावलेल्या 17 एजन्सी चालकांना पालिकेने 15 दिवसांत स्ट्रक्चरल ऑडीट सादर करण्यासाठी नोटीस बजावली.

45 होर्डीगला परवानगी
भुसावळ पालिकेने 17 एजन्सी धारकांच्या माध्यमातून 45 होर्डींगला परवानगी आहे मात्र शहरातील विविध मार्गांवर परस्पर परवानगी न घेता बॅनर व लोखंडी सळईंचे स्ट्रक्चर तयार करुन बॅनर लावले जातात. याप्रकरणी प्रशासक जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या सूचनेनुसार लिपीक अनिल भाकरे व कर्मचार्‍यांनी सोमवारी व मंगळवारी यावल रोडवरील 30 बॅनर हटवले तर 17 एजन्सी धारकांना नोटीस बजावून 15 दिवसांच्या आत स्ट्रक्चरल ऑडीट सादर करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी स्टेशनरोड, खडकारोड परिसर, वरणगावरोड, जळगाव नाका, महामार्गाचा भाग आदी ठिकाणीही अनधिकृत व धोकादायक बॅनर काढण्यात आले.

थकबाकी भरण्याचा अल्टीमेटम
शहरात होर्डींग व बॅनर लावण्यासाठी 17 एजन्सींनी कंत्राट घेतले आहे. यातील बहूतांश एजन्सीधारकांनी गेल्या वर्षाची थकबाकी भरली नाही. याबाबतही पालिकेने नोटीसीव्दारे एजन्सीधारकांना अल्टीमेटम दिला आहे. थकबाकी न भरल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !