जीर्ण पाईप लाईन ; खंडित वीजपुरवठ्यासह लिकेजच्या अडचणी : मुख्याधिकारी महेश वाघमोडे
दिवसागणिक वाढतोय शहराचा विस्तार : पाण्याचा जपून व काटकसरीने वापर गरजेचा
dilapidated pipe line ; Leakage problems with intermittent power supply : Principal Mahesh Waghmode भुसावळ : भुसावळकरांना पाणीपुरवठा करणारी पाईप जाईन सुमारे 50 वर्ष जुनी आहे व ती आजघडीला पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पाण्याचा दाब वाढवल्यास पाईप लाईन लिकेज होते व लिकेज दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पुढे ढकलला जातो शिवाय उन्हाळ्यामुळे विजेला मागणी वाढली असलीतरी खंडित वीजपुरवठ्यामुळे जलकुंभ भरत नसल्याने शहराला 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले. नागरिकांच्या अपेक्षा रास्त असल्यातरी पाणीपुरवठा करण्यास अनेक अडचणी येत असल्याचे ते म्हणाले.
शहरासाठी केवळ दोन जलकुंभ
मुख्याधिकारी म्हणाले की, शहराची पाणीपुरवठा योजना त्यावेळी 70 ते 80 हजार लोकांसाठी होती मात्र आजघडीला शहराची लोकसंख्या अडीच लाखांवर गेली आहे. शहराचा दररोज विस्तार वाढत आहे, नव-नवीन वस्त्या विकसीत होत असल्याने तेथे पालिका मूलभूत सोयी-सुविधा पुरवत आहेत मात्र योजना जुनी असल्याची अडचण आहे. सातत्याने नळ संख्या वाढत आहे मात्र मुळातच शहरासाठी केवळ दोन जलकुंभ आहे व शहराचा वाढणारा विस्तार पाहता 24 तासात जलकुंभ भरूनही दररोज पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. 24 तास पाण्याची उचल करूनही जेमतेम 9 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो व यापेक्षा अधिक कमी काळात पाणीपुरवठा शक्यच नाही.

अमृत योजनेनंतर मिळेल दिलासा
मुख्याधिकारी म्हणाले की, अमृत योजनेचे चार ते पाच टक्के काम अपूर्ण आहे. मुळातच 90 कोटींची असलेली योजना जलस्त्रोत बदलल्यामुळे 48 कोटींवर आणली व असून सुमारे 46 कोटींपर्यंत कामे झाली आहेत. मंजूर ठिकाणी पाईप लाईन अंथरण्यात आली असून लवकरच टप्पा दोनला आचारसंहिता संपताच मंजुरी मिळताच कामे होतील मात्र त्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी लागणार आहे.
टँकरने पाणीपुरवठा
शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता नव्याने दोन टँकर विकत घेण्यात आले तर दोन टँकरची दुरुस्ती करून त्याद्वारेदेखील पाणी पुरवले जात आहे. उन्हामुळे खाजगी विहिरी व बोअरींग 25 टक्के आटल्या आहेत त्यामुळे नागरिकांकडून पाण्याची अधिक मागणी वाढली आहे. अनेक भागात बुस्टर पंप लावले असून विहिरींचा गाळ काढण्यात आल्याचे ते म्हणाले.
जलपुर्नभरण काळाची गरज
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एक तरी झाड लावून जगवले पाहिजे शिवाय रेन वॉटर हार्वेस्टींग काळाची गरज असल्याचे मुख्याधिकारी वाघमोडे म्हणाले. बोअरमध्ये पुर्नभरण केल्यानंतरही पुढील काळात पाणी मिळेल, असेही ते म्हणाले.
तर नागरिकांचा रोष वाढेल
पालिकेच्या विहिरींची लवकरच स्वच्छता करण्यात येईल शिवाय या विहिरीवर पाणी घेण्यासाठी बाहेरून पाणी घेणार्यांकडून रक्कम आकारल्यास नागरिकांचा रोष वाढेल त्यामुळे पाणी भरण्यास कुणालाही मनाई केली जात नाही, असेही मुख्याधिकार्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.




