भुसावळातील अमृत योजनेला दिरंगाईची विषबाधा

मुदत संपल्यानंतरच्या पाच वर्षानंतरही योजनेचे 10 टक्के काम अपूर्णच !


भुसावळ : भुसावळातील अटल मिशन फार रेजुवेनशन एंड अर्बन ट्रांसफार्मेशन अर्थात अमृत योजना सध्या कोमात आहे अर्थात याला कारणीभूत उदासीन लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी आहे. 25 ऑक्टोंबर 2019 पर्यंत भुसावळात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र मुदतवाढ दिल्यानंतरच्या पाच वर्षातही योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याचे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. देशभरात अमृत योजनेची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली मात्र भुसावळ त्याबाबत अपवाद ठरले आहे. भुसावळच्या तापी पात्रातील बंधारा ओसंडून वाहत असताना शहरवासीयांना मात्र टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे तर दुसरीकडे अमृतचे कामही कासवाच्या गतीलाही लाजवेल असे सुरू असताना एकही राजकिय पक्ष वा लोकप्रतिनिधींमध्ये याबाबत बोलण्याची हिंमत नाही हे या शहराचे दुर्दैव आहे.

साडेपाच वर्षानंतरही योजनेचे काम संथ गतीने
26 ऑक्टोंबर 2017 रोजी अमृत योजनेच्या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. 24 महिन्यात अर्थात 25 ऑक्टोंबर 2019 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षीत होते मात्र साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही 20 ते 25 टक्के काम अपूर्ण आहे. पहिल्या टप्यातील कामांमध्ये केवळ पाईप लाईन व 11 ठिकाणी जलकुंभाचे कामही ठेकेदार पूर्ण करू शकला नाही, मात्र या प्रकरणी सर्वच राजकिय पक्ष, लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प असल्याने ठेकेदाराचे अधिक फावत आहे.



प्रस्ताव अडकला लात फितीत
अटल मिशन फार रेेेजुवेनशन एंड अर्बन ट्रांसफार्मेशन अर्थात अमृत योजनेच्या दुसर्‍या टप्प्यातील 185 कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पालिकेने नोव्हेंबर 2022 महिन्यात शासनाकडे सादर केला मात्र सात महिने उलटूनही शिखर समितीने मंजूरी दिली नाही. तापी काठावरील भुसावळ शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पहिल्या टप्यातील कामे आता दुसर्‍या टप्प्यात समाविष्ट करून पालिकेने नोव्हेंबर 2022 मध्ये शासनाला 162 कोटींचा प्रस्ताव दिला मात्र हा प्रस्ताव राज्याच्या शिखर समितीकडे मंजूरीसाठी लालफितीत अडकला आहे. तापीचा बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत असताना शहरात मात्र हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरासोबतच जळगावची योजना सुरू आली व आता या योजनेतून काही भागांना अमृतचे पाणी मिळाले मात्र भुसावळात मात्र कामे अपूर्ण आहेत.

मंजुरी नसल्याने या कामांना ब्रेक
अमृत योजनेतील दुसर्‍या टप्प्यातील 185 कोटींच्या निधीतून शेळगाव बॅरेजमधील जॅकवेल उभारणी, महामार्गावर अद्ययावत जलशुध्दीकरण केंद्र उभारणी, जॅकवेलपासून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत 10 किलोमीटर अंतराची 800 मीमी व्यासाची पाईप लाईन, शहरातील सुमारे 150 किलोमीटरची वाढीव पाईप लाईन, पंचशील नगरातील 12 लाख लीटरचा एक जलकुंभ आदी कामे समाविष्ठ करण्यात आली आहेत मात्र मंजुरीच नसल्याने ही कामे होऊ शकली नाहीत.

378 कोटींचा प्रस्तावही धुळखात
पालिकेने अमृत दोन या अभियानातून पाणीपुरठ्यासोबतच सांडपाणी व्यवस्थापन, भुयारी गटारी आदींच्या कामांसाठी शासनाला 378 कोटींचा प्रस्ताव दिला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या सोबतच हा प्रस्ताव देखील धुळखात पडून आहे. आगामी काळात पाणीपुरवठा योजना झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदून भूमिगत गटारी कशा होतील? असा प्रश्न आहे. एकंदरीत पालिकेकडे नियोजनाचा अभाव व योग्य व्यवस्थापन नसल्याने तसेच पाठपुरावा नसल्याने प्रस्ताव रेंगाळले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !