सावद्यातील व्यापारी संकुलाचा स्लॅब कोसळला : सुदैवाने हानी टळली


सावदा : नगरपालिकेच्या जुन्या व्यापारी संकुलाचा जुन्या पोस्ट ऑफिसचा स्लॅब मंगळवारी कोसळला. सुदैवाने या घटनेत भाजीपाला व्यवसाय करणारे शालिग्राम रामजी भोगे हे गृहस्थ बालंबाल बचावले. अंदाजे 35 ते 40 वर्षांपूर्वी नगरपालिकेने या व्यापारी संकुलाचे बांधकाम केले होते आणि या व्यापारी संकुलामध्ये काही वर्ष शासकीय निमशासकीय सहकारी संस्था यांचे कार्यालये कार्यरत होती परंतु ही इमारत जीर्ण व पडकी आणि धोकादायक झाल्याने या इमारतीतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय ही इतरत्र स्थलांतरित करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून ही इमारत रिकामी आहे.ती केव्हा कोसळेल ? याचा भरवसा नाही.

पालिकेची बेफिकीरी कायम
अधून-मधून या इमारतीचा काही भाग कोसळत असतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व्यवसायीकांनी पालिकेला याबाबत अनेकवेळा सुचवूनही पालिकेची बेफिकीरी कायम आहे. व्यापारी संकुलाच्या बाजूला डेली भाजीपाला मार्केट भरते त्यामुळे या भागात नागरिकांची वर्दळ असते. मंगळवार, 28 मे रोजी नित्यनेमाप्रमाणे भाजीपाला व्यावसायीकांनी आपली दुकाने मांडली आणि दुपारच्या वेळी अचानक वरील स्लॅब खाली कोसळला. यात भाजीपाला व्यवसाय करणारे शालिग्राम रामजी भोगे (60) हे थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला मुक्का मार लागला.



ईमारत पाडण्याबाबत पालिकेची बेफिकीरी
ही इमारत जुनी आणि जीर्ण झाल्याने ती पाडण्याचा ठराव ही पालिकेमध्ये काही वर्षांपूर्वी झाला मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. हा परिसर व्यावसायीक आणि रहिवास असल्याने ही संपूर्ण इमारत दर कोसळली तर जीवितहानी देखील होऊ शकते व आगामी पावसाळ्याचे दिवस पाहता नगरपालिकेने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !