भुसावळ-यावल बसमध्ये जागेवरून वाद : तिघांना मारहाण करीत महिलेचा विनयभंग
Argument over seat in Bhusawal-Yaval bus: Woman molested by beating three people यावल : भुसावळ-यावल बसमध्ये यावलला येत असताना जागा सांभाळण्याच्या कारणावरून दोन जणांमध्ये वाद झाला व यावल शहरात बस दाखल झाल्यावर एका तरुणाने मोबाईलवर कॉल करून काही तरूणांना बस स्थानकात बोलावले व त्यांनी बसस्थानकात येऊन 29 वर्षीय महिला, तिचा भाऊ आणि तिची वहिनी यांना शिवीगाळ करून मारहाण करीत महिलांचा विनयभंग केला. ही घटना सोमवार, 27 मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे यावल शहरात काही काळ तणाव निर्माण झाला.
जागेवरून उफाळला वाद
भुसावळ येथून सोमवारी सायंकाळी बसद्वारे 29 वर्षीय महिला, तिचा भाऊ आणि वहिनी हे यावल-भुसावळ बसमधून प्रवास करीत होते. बसमध्ये जागा सांभाळण्याच्या कारणावरून यावल शहरातीलच एका तरुणांसोबत त्यांचा वाद झाला व हा वाद भुसावळ शहरातच मिटला मात्र रात्री आठ वाजेच्या सुमारास ज्यावेळेस एस.टी.बस यावल शहरात दाखल झाली. तेव्हा यावल शहरातील त्या तरुणाने त्याच्या काही मित्रांना मोबाईलवर कॉल करून यावल बसस्थानकावर बोलावले. तेथे काळ्या रंगाची बुलेट क्रमांक 8734 व एक अन्य दुचाकीवर असे पाच जण एकत्र आले व त्यांनी 29 वर्षीय महिला, तिचा भाऊ आणि तिच्या वहिनीला या सहा जणांनी मारहाण केली आणि या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत त्यांचा विनयभंग केला.

यावलमध्ये अफवेने वातावरण ताईट
या घटनेनंतर शहरात एकच अफवा पसरली आणि दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ पोलिसांनी यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत जाऊन दुकाने बंद केली. एका जमावाने अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर ठिय्या करीत तत्काळ संशयीतांना अटक करा, अशी मागणी करीत रस्ता रोखला. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध विनयभंग सह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.