वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत शॉक लागल्याने मजुराचा मृत्यू

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेला ‘खो’ : बेपर्वा कंत्राटदारावर कारवाईची मागणी


Laborer dies due to shock in Varangaon Ordnance Factory वरणगाव : वरणगाव आयुध निर्माणीत फोर पोल स्ट्रक्चरवरील डिस्चार्ज रॉड काढताना मजुराला शॉक लागल्याने तो जमिनीवर पडताच मृत झाला. सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घडली घडली. सुनील अशोक सुरवाडे (40, शिंदी, ता.भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे. मयत मजुराकडे सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टीबेल्ट, हँड ग्लोव्हज अशी कोणतीही साधने नसल्याने मजुरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

डोक्याला मार लागल्याने मजुराचा मृत्यू
भुसावळ येथील सुनील भिरूड यांनी आयुध निर्माणीतील 11 केव्ही वीज वाहिनी मेंटेनन्सचे कंत्राट घेतले आहे. हे काम मंगळवारी सकाळी 7 वाजता सुरू झाले. 9 वाजता काम आटोपून फाईव्ह टाईप जवळ फोर पोल स्ट्रक्चरवरील डिस्चार्ज रॉड काढण्यासाठी शिंदी सुरवाडा (ता.भुसावळ) येथील रहिवासी सुनील अशोक सुरवाडे (40) हा मजूर 12 ते 13 फूट अंतरावर चढला. हे काम करून सर्व जण घरी निघणार होते. मात्र 11 केव्हीची लाईन बंद असताना देखील शॉक लागून तो खाली जमिनीवर पडला. खालील भाग काँक्रिटचा असल्याने त्याला जबर मार लागला. हा प्रकार सुपरवायझर दिलीप कोल्हे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आयुध निर्माणीला कळवले. नंतर सुनीलला आयुध निर्माणीच्या दवाखान्यात दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकारी डॉ.जॉन मथाई यांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आयुध निर्माणीतील दवाखान्यात आलेल्या सुनील यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राकेश ओझा यांनी भेट दिली. यावेळी नातेवाईकांनी व युनियन पदाधिकार्‍यांनी घेराव घालून मदतीची मागणी केली. दरम्यान, वरणगावचे एपीआय भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश देशमुख व सहकार्‍यांनी बंदोबस्त ठेवून अनुचित प्रकार टाळला.

ठेकेदाराच्या आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात
मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी दवाखान्यात गर्दी केली. मृत सुनील यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी मदतीची मागणी केली मात्र हे काम ठेकेदाराचे असल्याने आयुध निर्माणी प्रशासनाने हात वर केले. यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ठेकेदाराने मदतीचे आश्वासन दिल्यावर सहा तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला व वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत मजूर ठेकेदाराकडे कामाला असला तरी घटना आयुध निर्माणी परिसरात घडली. यामुळे प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी मजदूर संघ, इंटक युनियन व कामगार युनियनने महाप्रबंधकांकडे केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !