रेल्वेलाईन ओलांडताना रेल्वेच्या धडकेने वाघोडच्या युवकाचा मृत्यू
रावेर : रेल्वे लाईन ओलांडत असताना रेल्वे गाडीची जोरात धडक बसल्याने रावेर तालुक्यातील वाघोड येथील युवकाचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रेल्वेच्या धडकेने मृत्यू
मंगळवारी रात्री साडे सात वाजेचे सुमारास वाघोड येथील दीपक संतोष महाजन (33) हा शौचालयास रेल्वे लाईन ओलांडून गेला होता. परत येत असतांना अप लाईनकडून अचानक आलेल्या रेल्वेची धडक बसल्याने तो बाजूला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ बर्हाणपूर येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत जितेंद्र महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन आमोदकर करीत आहेत.
