भुसावळ शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या
भुसावळ (29 मे 2024) : भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून निष्पन्न केली जात होती.
कार अडवून केली हत्या
बारसे व राखुंडे हे जळगावकडून शहराकडे कार (एम.एच.19 इजि 0187 ) ने येत असताना जुना सातारा भागातील मरीमाता मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवत गोळीबार केला. हल्ल्यात दोघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना ट्रामा केअर सेंटर व शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.


पोलीस अधिकाऱ्यांची धाव
घटनास्थळी जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, बाजारपेठचे निरीक्षक गजानन पडघन यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली.
भारत नगरात गोळीबार
भुसावळ शहरातील भारत नगरातदेखील आरोपींनी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यावेळी आरोपींच्या दुचाकीची देखील जमावाने तोडफोडदेखील केल्याचे सांगण्यात आले.