भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयीतांना फाशी द्या

घोषणांनी प्रांत कार्यालय दुमदुमले : भुसावळ शहर महिला संगठनतर्फे निघाला मोर्चा


Hang the suspects in the Bhusawal double murder case भुसावळ : शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भुसावळ शहर महिला संगठनतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. हत्याकांडातील संशयीतांना फाशी द्या, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवा, शहरातील दादागिरी मोडून काढा आदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. यावेळी मोर्चातील महिलांनी प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता.

संशयीताना फाशी देण्याची मागणी
माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या मारून बुधवार, 29 मे रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. बारसे व राखुंडे यांच्या हत्येतील संशयीतांना अटक करून त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी करण्यासाठी शहरातील वाल्मीक नगरातून बुधवार, 5 जून रोजी दुपारी 12 वाजता भुसावळ शहर महिला संगठनतर्फे मोर्चा निघाला. हा मोर्चा जामनेर रोडने पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील लोखंडी पूलाखालून हंबर्डीकर चौक, गांधी पुतळा, जळगाव रोडने प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकरी महिलांनी संशयीतांना फाशी द्यावी, अशी मागणी केली. संशयीतांना मदत करणार्‍यांना अटक करा, संशयीतांच्या घरावर बुलडोझर चालवा आदी मागण्यांचे निवेदन महिलांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना दिले. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, संशयतांविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

एक हजाराहून अधिक महिलांचा सहभाग
मोर्चात सुमारे एक हजार महिलां सामील झाल्या होत्या. यावेळी तृतीयपंथींचाही सहभाग होता. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन पडघन, निरीक्षक संदीप रणदिवे, महिला पोलीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर उषाबाई किशोर घारू, इंद्राबाई जाधव, शालिनी लोट, करुणा बारसे, ज्योती बारसे आदी महिलांच्या निवेदनावर सह्या होत्या.

प्रांताधिकार्‍यांना बोलाविले बाहेर
प्रांताधिकारी पाटील यांना निवेदन दिल्यावर महिलांचे शिष्ठमंडळ बाहेर आले. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या महिलांनी प्रांताधिकारी पाटील यांना बाहेर बोलावले. प्रांत बाहेर आल्यावर महिलांनी त्यांच्याशी चर्चा करून संशयीतांवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !