बोदवड शहरात सात लाखांचा गुटखा जप्त
बोदवड : जळगाव अन्न व औषध प्रशासनाने गोपनीय माहितीच्या आधारे एका वाहनातून सात लाख लाख 28 हजार 50 रुपयांचा राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व तंबाखू जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे. बर्हाणपूर शहरातून बोदवड शहरात गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्याने संबंधित विभागाने मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावर बुधवार, 5 जून रोजी सकाळी 9.30 सापळा रचला. वाहन क्रमांक (एम.एच.19 सी.व्ही.7888) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखू आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले.
दोघांविरोधात गुन्हा
याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार (37, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार वाहन चालक अभिषेक ज्ञानेश्वर बारी (24, ओम शांती नगर, बोहरा स्कूलजवळ, जामनेर) व आशिष लक्ष्मणदास बुर्हाणी (मे साईनाथ एजन्सी, बर्हाणपूर) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

