भुसावळातील दुहेरी हत्याकांड : विष्णू पथरोडसह दोघांना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Bhusawal double murder case: Vishnu Pathroad along with both in police custody till June 13 भुसावळ : भुसावळातील दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी विष्णू पथरोड (वाल्मीक नगर, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील पोखरणी (जि.हरदा) येथून अटक केल्याने आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. अटकेतील विष्णू पथरोड यास शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, हत्याकांडानंतर भारत नगरात गोळीबार केल्याच्या दुसर्या गुन्ह्यात करण पथरोड यास अटक केल्यानंतर त्यासदेखील न्यायालयात हजर केले असता त्यास 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
विष्णू पथरोडला 13 पर्यंत पोलीस कोठडी
जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर बुधवार, 29 मे रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास कारमधून जात असलेल्या माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी विनोद चावरिया, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, किरण कोळी व करण पथरोडला यांना अटक केली आहे. चारही संशयीत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर हत्याकांड प्रकरणी संशयीत विष्णू पथरोड यास मध्यप्रदेशातील पोखरणी (जि.हरदा) येथून जळगाव गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यास शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवार, 7 जून रोजी संशयीताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

भारत नगरात गोळीबार : करण पथरोडला अटक
बारसे व राखुंडे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी जवळच असलेल्या भारत नगरात जावून बेछूट गोळीबार केला होता तर दोन घरांवरही फायरींग केली होती. याप्रकरणी स्वतंत्र जीवे ठार मारण्याचा गुन्हा शहर पोलिसात दाखल करण्यात आल्यानंतर या गुन्ह्यात करण पथरोड याला अटक करण्यात आली. संशयीताला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 13 जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हत्याकांडातील संशयीत राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया तसेच किरण कोळी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची नंदुरबार कारागृहात रवानगी करण्यात आली.
