किनगावात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले
यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे शनिवारी पहाटे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह महसूल विभागाच्या गस्तीपथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. गावाच्या चौफुलीजवळ ही कारवाई करण्यात आली.
अवैध वाळू वाहतूक पुन्हा ऐरणीवर
अवैधरित्या वाळू घेऊन हे ट्रॅक्टर किनगाव गावात जात होते. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने दोन्ही ट्रॅक्टर घटनास्थळी पंचनामा करून ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले. ट्रॅक्टर मालकांना अवैध वाळू वाहतूक केल्याबाबत दंडाची नोटीस बजावण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. किनगाव, ता.यावल या गावात पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली होती. प्राप्त माहितीची पडताळणीकरिता शनिवारी पहाटे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, तलाठी ईश्वर कोळी, तलाठी वसीम तडवी, तलाठी मिलिंद कुरकुरे, तलाठी शरीफ तडवी, तलाठी श्वेता ससाने, वाहन चालक अरविंद बोरसे यांच्यासह गस्ती पथक किनगावच्या चौफुलीजवळ तळ ठोकून होते. अवैधरित्या वाळू घेऊन किनगाव गावाकडे दाखल होतांना विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर मिळून आले. दोघा चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने घटनास्थळी पंचनामा करून दोघांना ताब्यात घेण्यात आले व ट्रॅक्टर मालक मनोज विश्वास कोळी व विवेकानंद मधुकर पाटील (दोन्ही राहणार विदगाव, ता.जळगाव) या दोघांना दंडाची नोटीस बजावण्याची आली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

